मुंबई : कोरोना रूग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, चव कमी होणे, वास न येणे आणि अंगदुखी अशी समस्या दिसून येत होत्या. परंतु, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेक रूग्णांमध्ये आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर बहुतेक रूग्णांमध्ये पाठदुखीची समस्या जाणवत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रूग्णांना गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घरच्या घरी बसून राहिल्याने शारीरिक हालचाल मंदावल्याने अनेकजण पाठदुखीने त्रस्त आहेत.
आशिष गावंडे हे इंजिनिअर आहेत. अनेक दिवसांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. त्यांना बसता किंवा उठताही येत नव्हते. दैनंदिन कामेही ते करू शकत नव्हते. अचानक चार दिवसांनी त्यांना ताप आला. औषधोपचारानंतरही ताप कमी होत नव्हता. कोरोना चाचणी केली असती ती पॉझिटिव्ह आली. परंतु, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना गृह अलगीकरणात राहून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार तातडीने उपचार करण्यात आले. याशिवाय पाठदुखी कमी करण्यासाठी आवश्यक औषधोपचारही सुरू करण्यात आले होते. तर वजीद हा तरूण दोन वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. पाठदुखीचे दुखणे असताना कोरोनातून बरे झाल्यानंतर या तरुणाला कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. असे रूग्ण औषधोपचार आणि जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास बरे होऊ शकतात.
------------------------
- कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या २० ते ४० वयोगटातील रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर पाठदुखीची तक्रार जाणवत आहे.
- पाठदुखीच्या दुखण्यामागचे एक मानसिक कारणसुद्धा आहे.
- आजारपणामुळे घरच्या घरी उपचार होत असल्याने शारीरिक हालचाल मंदावते.
- व्यायामाचा अभाव आणि चालणे होत असल्याने एकाच जागी बसल्याने पाठीचे दुखणे वाढत आहे.
- बरे झालेले बऱ्याच रुग्णांना काही आठवड्यांपर्यंत पाठीच्या दुखण्यामुळे त्रास होऊ शकतो.
------------------------
कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नियमित संतुलित आहार घ्यावा, घरच्या घरी दररोज पहाटे १५ मिनिटे व्यायाम करावा, चालण्याचा व्यायाम करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. बराचवेळ एकाच ठिकाणी बसू नका. वेदना आणि उबळपणापासून बराच आराम मिळविण्यासाठी मागून एक उष्मा पॅड लावा, जड वस्तू उचलू नका, भरपूर पाणी प्या आणि पुरेशी विश्रांती घ्या.
- डॉ. ओम पाटील