मुंबई : हलाखीच्या आर्थिक परिस्थितीबरोबरच अशिक्षित आणि साधारण विशीतील तरुण लष्कर ए तय्यबाच्या टार्गेटवर असल्याचे मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर उघड झाले असले, तरी अजूनही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या हल्ल्याप्रकरणी पकडलेल्या अजमल कसाबसारखे अनेक दहशतवादी तयार करण्याचे काम अजूनही सुरूच असल्याचे तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे मुंबईसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्याचे निष्कर्ष त्यांनी गेल्या दहा वर्षांत काढले आहेत.
२६/११ च्या हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षण दिले गेले आणि ज्यांना प्रत्यक्ष पाठवले गेले, त्या सर्वांचे शिक्षण सातवीपर्यंतच होते. मुंबईवर हल्ला करण्यासाठी एखादी शिक्षित व्यक्ती पाठवली असती, तर तिने आयत्या वेळी प्रशिक्षण बाजूला ठेवून कदाचित स्वत:चे डोके चालवले असते. त्यामुळे लष्कर ए तय्यबाने आखलेल्या कटापेक्षा वेगळेही घडू शकले असते, असे कसाबच्या चौकशीतून समोर आल्याचे निष्कर्ष २६/११ चे तपास अधिकारी रमेश महाले यांनी त्यांच्या पुस्तकात मांडले आहेत. महाले यांच्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान कराचीमधल्या नियंत्रण कक्षात बसलेले लष्करचे म्होरके सॅटेलाइट फोनद्वारे अतिरेक्यांना आदेश देत. ते तंतोतंत पाळले जावे, यासाठी तरुणांच्या निवडीमागचा दुसरा निकष असायचा तो आर्थिक परिस्थितीचा. मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेले दहाही अतिरेकी गरीब कुटुंबातील होते. हे काम करून जिवंत परत आलात तर दोन लाख आणि मरण पावलात तर तीन लाख रुपये कुटुंबियांना देण्याचे आश्वासन तय्यबाच्या म्होरक्यांनी त्यांना दिले होते. वयोगट हे त्यांचे तिसरे वैशिष्ट्य होते. २० ते २१ वयोगटातील तरुणांना ते आपल्या जाळ्यात ओढत. या वयात अंगात जोम असतो, काहीतरी करुन दाखविण्याची उर्मी असते, हे हेरून तय्यबाकडून आखणी केली जाते.
पाकिस्तानच्या फरीदकोट येथील उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळेत कसाब चौथीपर्यंत शिकला. आई, वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असे कसाबचे कुटुंब. वडील फेरीवाले; तर कसाब खाद्यपदार्थ विकायचा. कसाबने शाळा सोडून हॉटेलमध्ये मजुरी सुरु केली. महिन्याकाठी हाती पैसे उरत नसल्याने त्याचे वडिलांसोबत भांडण होई. याच भांडणाला वैतागून त्याने घर सोडले आणि लष्कर ए तय्यबाच्या जाळ्यात तो अलगद अडकला. त्यांच्या तिन्ही अटींमध्ये तो चपखल बसत होता. पुढे आयएसआयने कसाबसारखे २३ तरुण अशा पद्धतीने जाळ्यात ओढले. मुंबईच्या हल्ल्याआधी यापैकी काही जण काश्मिरमध्ये मारले गेले होते, हे कसाबला माहित होते.याचपद्धतीने अजूनही तरूणांना जाळ््यात ओढण्याचे काम सुरू असल्याचे निष्कर्ष दहा वर्षांत तपास यंत्रणांनी जागतिक पातळीवर उघड केले आहेत.
असे दिले प्रशिक्षण...कसाबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कर ए तय्यबाने सुरुवातीला त्यांना २१ दिवसाचे ‘दौर ए सुफा’ नावाने प्रशिक्षण दिले. त्याच्यासोबत ३० तरुण तेथे होते. सुरुवातीला अहले हदिस म्हणजे कुराणच्या सच्च्या पालनकर्त्यांची दीक्षा देण्यात आली. या काळात त्यांना एकमेकांशी बोलण्याची आणि काही सांगण्याचीही परवानगी नसे. जिहादचे महत्त्व सांगत पुढे त्यांच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा ‘दौरा ए आमा’ सुरु झाला. प्रशिक्षणानंतर ‘भाई वसूल दौरा ए आमा’ लिहिलेली चिठ्ठी प्रत्येकाला दिली जात असे. बारा तासांचा प्रवास करुन मरकज अक्साला नेले जाई. तेथे डोंगराळ प्रदेशाच्या तळाशी ही चिठ्ठी दाखविल्यानंतर त्यांची अंगझडती घेऊन आत सोडले जाई. तेथून प्रत्येक टप्प्यावर त्यांची माहिती घेत पुढे नेण्यात येई. तेथील प्रशिक्षणात त्यांना कवायत, धावणे, डोंगर चढणे-उतरणे यातून शारीरिक क्षमता वाढवली जाई. त्यासोबत शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले जात असे. प्रशिक्षणानंतर त्यांना तीन महिन्यांसाठी घरी जाण्याची मुभा दिली होती. तळावर थांबलेल्यांना हातबॉम्ब, रॉकेट लाऊन्चर चालवण्याचे प्रशिक्षण मिळे. त्यानंतर पुढे सॅटेलाईटचा वापर करणे, नकाशाचे वाचन, जंगलात साठ तास उपाशी राहणे, पाठीवर वजन घेऊन डोंगर चढणे, गोळीबार चुकवणे हेही प्रशिक्षण देण्यात आले.