भाग्यश्री प्रधान, ठाणे जावयाला देण्यात येणाऱ्या अधिक महिन्याच्या वाणासाठी सोनारही सज्ज झाले आहेत. वाणांच्या वस्तूमध्ये चांदीचे निरांजन, तबक, ताट, ताम्हण, समई आदींचा समावेश असून सोनारांच्या दुकानांत गिऱ्हाइकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक सोनाराकडील या सर्व वस्तूंच्या डिझाइन्समध्ये मात्र फरक आहे. अधिक महिन्यात जावयाला पुरुषोत्तम म्हणजेच नारायण समजले जाते. त्यामुळे नारायणाची पूजा करण्यासाठी मुलींच्या आईवडिलांनी जावयाला एक ताट, त्यात मधोमध दिवा तसेच ३३ अनारसे किंवा बत्तासे देण्याची प्रथा आहे. ज्या सासूसासऱ्यांची जावयाला चांदीच्या वस्तू देण्याची ऐपत आहे, अशांनी सोनारांच्या दुकानांत गर्दी केली आहे. काही जण या वाणात जावयाला सोन्याचे वेढेही देतात. ते घेण्यासाठीही गर्दी असल्याचे सोनारांनी सांगितले. लग्नानंतरचे अधिक मासातील पहिले वाण असल्यास चांदीचे ताट दिले जाते. दुसरे वाण असल्यास ताम्हण दिले जाते. तिसरे वाण असल्यास वाडगे, चौथ्या वाणास समई आणि पाचव्या वाणास तबक दिले जात असल्याची माहिती वामन मराठे यांनी दिली.नाशिकची चांदी असल्यास जास्त प्राधान्य दिले जात आहे. तसेच काही डिझाइन्स राजस्थान, मध्य प्रदेश येथे बनवून आणल्या जात आहेत. तबक व ताटामध्ये नवीन डिझाइन्स घ्यायला गिऱ्हाईक प्राधान्य देत आहेत. ओम लिहिलेल्या तबकांची जास्त विक्री होत असल्याचे सोनारांनी सांगितले. चांदीच्या निरांजनांमध्येही लहानमोठे उपलब्ध असल्याचे मराठे यांनी सांगितले.
जावईबापूंच्या वाणासाठी सोन्या-चांदीच्या अनेक चीजा
By admin | Published: July 02, 2015 10:47 PM