मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात गिरगाव चौपाटीवर आयोजित मेक इन इंडियाच्या कार्यक्रमादरम्यान आगीची दुर्घटना घडली होती. या घटनेला कित्येक वर्षे उलटूनही आगीत फळ्या जळून नुकसान झालेल्या डेकोरेटरला भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई एक कोटी ३८ लाख रुपये असून, संबंधिताने उद्धव ठाकरे सरकारसोबतही पत्रव्यवहार केला आहे. २०१४ साली मेक इन इंडिया अंतर्गत गिरगाव चौपाटी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रात्री येथे आगीची घटना घडली. या आगीत एक कोटी ३८ लाख किमतीच्या फळ्या जळाल्या. आता याची नुकसानभरपाई मिळावी म्हणून संबंधित कंत्राटदार खेटे घालत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत याबाबत एक बैठकही झाली आहे. ज्यांनी आम्हाला काम दिले, त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, असे या कंत्राटदाराचे म्हणणे आहे.आता राज्य सरकारने तेव्हा हे काम विझक्राफ्ट नावाच्या कंपनीला दिले. या कंपनीने हे काम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना दिले. नितीन देसाई यांनी हे काम आणखी काही कंत्राटदारास दिले. आगीच्या घटनेत ज्याचे नुकसान झाले, त्याचे नाव ओमसाई प्लांक आहे. त्याचे म्हणणे असे आहे की, आम्हाला आमची भरपाई मिळाली पाहिजे. नवे सरकार असो किंवा जुने सरकार असो, दोघांसाेबतही पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, भरपाई देण्याबाबत कोणीच काही बोलत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.सरकारकडून पैसे मिळालेले नाहीत याप्रकरणी ‘लोकमत’ने विझक्रॉफ्टकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हालाही आमचे पैसे सरकारकडून प्राप्त झालेले नाहीत. आता आमच्याकडे एवढी माहिती आहे आणि ती आम्ही तुम्हाला दिली. या व्यतिरिक्त सध्या आमच्या हातात काहीच नाही.
आगीची दुर्घटना घडून अनेक वर्षे उलटली, तरी अद्याप प्रतीक्षा नुकसानभरपाईची
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:27 AM