Join us

माओवादी, नक्षलींचे पाक दहशतवादी संघटनेशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 2:20 AM

राज्य सरकारचा दावा; घातपात घडविण्याचा प्रयत्न

मुंबई : माओवादी व नक्षलवादी संघटनांचे पाकिस्तानची दहशतवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’सोबत थेट संबंध आहेत आणि त्यात गौतम नवलखा यांची महत्त्वाची भूमिका आहे. या दोन्ही संघटनांनी मिळून भारतात घातपात घडविण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला.

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासातून हे निदर्शनास आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. या प्रकरणात अटक केलेल्या सर्व आरोपींना देशाविरुद्ध युद्ध पुकारायचे होते. त्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि दशहतवादी कारवायांसाठी नक्षल व माओवाद्यांना हिजबुल मुजाहिद्दीनकडून मदत मिळत होती, असा आरोप सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला.

अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून पुरावे मिळाले, असा दावाही करत त्यांनी संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केली. हिजबुलच्या शकील शेख या दहशतवाद्याच्या संपर्कात नक्षलवादी संघटना होत्या, असे कामत म्हणाले.शहरी नक्षलवाद व कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी ज्येष्ठ विचारवंत गौतम नवलखा यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :नक्षलवादीदहशतवादी