मोकळ्या जागेच्या विकासातून मुंबई बंदरांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:10 AM2017-07-31T01:10:52+5:302017-07-31T01:10:52+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मोकळ्या जागांमधून मुंबई बंदराचा विकास केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे यांनी केले आहे.
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मोकळ्या जागांमधून मुंबई बंदराचा विकास केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे यांनी केले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या दोन दिवसीय कामगार शिक्षण शिबिरांदरम्यान ते बोलत होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वनगे म्हणाले की, बंदरांचा विकास करताना आयात-निर्यातीबरोबरच क्रुझ टर्मिनल, बंकरिंग, फॅसिलिटी, केमिकल टर्मिनल, शिवडी-एलिफंटा रोप वे, गॅस प्रकल्प, वडाळा येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय असे विविध प्रकल्प मार्गी लावले जातील. या योजना राबवून, पोर्ट ट्रस्टला चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे मुंबई बंदराला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. सध्या पोर्ट ट्रस्टकडे दोन हजार एकर जमीन पडीक आहे. या मोकळ््या जागेचा उपयोग मुंबई बंदरांच्या विकासासाठी केला जाईल. जवाहरद्वीप येथे ८०० कोटींचा धक्का बांधण्याचे काम सुरू असून, इंदिरा गोदीत ५० कोटी रुपये खर्च करून, सर्व सोयीयुक्त अशी अद्यावत सुधारणा सुरू आहे. शिवाय बंदरांवरील १५ हजार झोपड्यांचा एसआरए पद्धतीने पुनर्विकास करून, पोर्ट ट्रस्ट कामगारांना परवडणारी घरे देण्याचा विचारही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये म्हणाले की, ‘कामगार चळवळीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यासाठी कामगारांची एकजूट हवी आहे. सध्या आलेली मरगळ झटकून ३ मे २०१९ रोजी संघटनेची शताब्दी साजरी करण्यासाठी कामगारांनी सज्ज व्हावे,’ असेही आवाहन त्यांनी केले. पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी केंद्र शासनाने कामगारांना चांगली पगारवाढ देण्याचे आवाहन केले. मंत्री महोदयांनी पोर्ट उद्योगाला यंदा ६ हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे वाटाघाटी करताना या दाव्याचा कामगारांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.