मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:00 AM2020-03-15T05:00:53+5:302020-03-15T05:01:12+5:30
शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, इतर व विशेष मागासवर्ग प्रवर्ग आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे, भरत गोगावले यांनी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन मराठा आंदोलकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
मुंबई : गेल्या ४७ दिवसांपासून मराठा समाजातील तरुणांचे नोकरीतील नियुक्तीसाठी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होते. शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, इतर व विशेष मागासवर्ग प्रवर्ग आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे, भरत गोगावले यांनी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन मराठा आंदोलकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मराठा आंदोलन मागे घेण्यात आले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मराठा तरुणांच्या नियुक्तीसंदर्भात आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विनायक मेटे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय देऊ, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आंदोलकांची भेट घेण्यास पाठविले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने आंदोलकांना करण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आवाहनाला प्रतिसाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन न्याय मिळून देऊ, असे सांगितले. नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या शब्दांना मान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले, असे आंदोलक निखिल गायकवाड यांनी सांगितले.