मुंबई - राज्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेली जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाइलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेतून आंदोलनातून होणाऱ्या हिंसक घटनांवरुन नाराजी दर्शवली. त्यानंतर, जरांगे पाटील यांनीही आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यु झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यातच, अजित पवारांचे शिलेदार आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष मागणी केलीय. तसेच, मराठा बांधवांना आवाहनही केलंय.
बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या. त्यामध्ये, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तर, दुसरीकडे नगरपालिकेच्या इमारीलाही आग लावल्याची घटना घडली होती. त्यामुळे, राज्यात वातावरण अधिक गढूळ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेते मंडळींकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन मराठा समाज बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्यची मागणीही केलीय.
मराठा बांधवांनी संयम बाळगावा, मनोज जरांगेजी शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत. सरकार आरक्षण देण्यास प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री महोदयांनी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचे आदेशही दिले आहेत. एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास सर्व आमदार प्रयत्नशील आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच, पत्र लिहून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केलीय.
मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्याला वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी चर्चा घडवून आणण्याकरिता अतितात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे. तसेच संघर्षयोध्दा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या पुढील दिशा मजबुत करण्यासाठी समाजाला त्यांची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी तुर्तास उपोषण मागे घेऊन हा लढा सुरुच ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही म्हटले आहे.
जरांगे पाटलांचं आंदोलकांना आवाहन
गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला शांततेत लढा सुरू आहे; परंतु काही ठिकाणी होणारी जाळपोळ, उद्रेक पाहता थोडी शंका येत आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी हा लढा आहे. त्यामुळे जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.