Join us

भुजबळांविरुद्ध मराठा उमेदवार; नाशिकमधून जरांगेंना पाठवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 3:50 PM

मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरुन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं.

मुंबई/नाशिक - महायुतीतील जागावाटपावर अंतिम निर्णय झाला असून आजच उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिकच्या जागेवरुन सध्या महायुतीत आलबेल नसल्याचे समजते. नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार की नाही, यावरुन खलबते सुरू आहेत. त्यामुळे, नाशिकची जागा कोणाला सुटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, नाशिकच्या जागेवर अजित पवार गटाने बाजी मारली असून मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने उमेदवार देण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. 

मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरुन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्यानंतर, मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. आता, निवडणुकांच्या राजकीय मैदानातही ही लढाई पुन्हा पाहायला मिळणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्याचे समजते. या जागेवर मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यत आहे. त्यामुळे, येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

सकल मराठा समाजाने नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील शेवंता लॉन्समध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकांवर चर्चा झाली. यावेळी, मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेवरुन मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. त्यामुळे, नाशिक मतदारसंघातून भुजबळ किंवा त्यांचा पुतण्या उमेदवार असल्यास, सकल मराठा समाजही मराठा उमेदवार मैदानात उतरवणार आहे, असा निर्णयच येथील बैठकीत झाला. मराठा समाज बांधवांकडून या बैठकीचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार असून मराठा उमेदवाराची चाचपणीही समाजाने सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे, नाशिकमध्ये भुजबळ यांना तिकीट मिळाल्यास तिरंगी सामना होणार आहे. 

भुजबळांनी श्रीकांत शिंदेंना सुनावले होते

हेमंत गोडसे हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील, कामाला लागा असे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभेत म्हटले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी श्रीकांत शिंदेंना हा अधिकार नसल्याचे म्हटले होते. नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना काही अधिकार नाही. राजकारणामध्ये थोडी शिस्त ही सगळ्यांनीच पाळली पाहिजे, अशा शब्दांत भुजबळ यांनी श्रीकांत शिंदेंना फटकारले होते.  

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलनाशिकलोकसभा निवडणूक २०२४निवडणूकछगन भुजबळ