मुंबई : इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजात मराठा समाजाला समाविष्ट करू नये अशी मागणी कुणबी समाजातर्फे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे करण्यात आली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली.राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षांना कुणबी समाजातर्फे शनिवारी निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने नेमलेल्या न्या.बापट आयोगाचा अहवाल नाकारून सरकार जाणिवपूर्वक संविधानाच्या तरतुदींकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या समाजाचा समावेश ओबीसी समाजामध्ये करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यासाठी मराठा व कुणबी समाज एक असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मराठा व कुणबी स्वतंत्र असून त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होत नसल्याच्या मुद्द्याकडे कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प आरक्षण आहे, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश झाल्यास ओबीसी समाजावर अन्याय होईल, अशी भूमिका मांडण्यात आली. संविधानाच्या कलम ३४० अन्वये ओबीसी जात समूहाला आरक्षणाची सुविधा देण्यात आली. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कुणबी समाज युवक संघटनेचे अध्यक्ष माधव कांबळे यांनी केला.कुणबी समाज मागासलेला तर मराठा समाज पुढारलेला आहे. त्यामुळे त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी केली. राजकीय दबावाला बळी पडून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यास ओबीसी समाजावर अन्याय ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको, कुणबी समाज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:06 AM