Join us  

'मातोश्री'बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; अंबादास दानवे बोलले, ही भाजपाची माणसं, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:39 PM

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिली.

मुंबई - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय ते स्पष्ट करा अशी मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर धडक दिली. उद्धव ठाकरेंनीमराठा आरक्षणावर त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली. मात्र उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने या आंदोलकांनी मातोश्रीबाहेरच ठिय्या देऊ असा निर्धार केला. मात्र त्याचवेळी आलेले विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी या लोकांना कुणी इथं पाठवलं हे आम्हाला माहिती असून आमची भूमिका जगजाहीर आहे असा टोला आंदोलकांना लगावला.

अंबादास दानवे म्हणाले की, भेटायचं होतं तर वेळ घेऊन यायचं होतं. रमेश केरे पाटील हा भाजपाचा माणूस आहे. तो विखेंचे बॅनर लावत असतो. हे मुद्दाम केले जातंय. सरकारने आरक्षणावर भूमिका घ्यावी आमचा त्याला पाठिंबा आहे हे आम्ही सांगितले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये थोडी आहेत त्यामुळे ते भूमिका घेणार आहेत, या लोकांनी विधानभवनात, वर्षा, सागर बंगल्यावर गेले पाहिजेत. आमच्या पक्षाची भूमिका सातत्याने स्पष्ट झाल्या आहेत. वारंवार भूमिका सांगितली आहे. मराठा आरक्षणावर विधिमंडळात प्रस्ताव आला त्यावेळी आमची भूमिका मांडली आहे असं त्यांनी सांगितले.

त्यानंतर अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. तेव्हा तुम्ही साहेबांची वेळ घेतली पाहिजे, त्यांची तब्येत कशी आहे काय आहे, असं चालत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. ४-५ जण या, आम्ही बोलू, तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडे जा..तुम्हाला कुणी पाठवलं आम्हाला माहिती आहे. मी साहेबांशी बोलतो, ४-५ जणांना बोलवायचं पाहतो. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही आला असाल तर आम्ही भेटणारही नाही. आमची भूमिका सुरुवातीपासून सांगितली आहे. मनोज जरांगेंनी तुम्हाला पाठवलं नाही हे ते म्हणतात असं दानवेंनी आंदोलकांना म्हटलं.  त्यावर आमचं आंदोलन हे सर्वपक्षीय नेत्यांच्या घरामसोर होणार असून मराठा क्रांती ठोक मोर्चाने एकनाथ शिंदेंविरोधात कितीदा आंदोलन केलंय हे सर्वांना माहिती आहे असं आंदोलक रमेश केरे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या लोकांमधील अर्ध्या लोकांचे फोटो भाजपा नेत्यांसोबत मंत्रालयाला जवळ लागतात. हे जाणीवपूर्वक केलं जातंय असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटावं की नाही हे स्पष्ट करावे. तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा. आमचे आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर असेल. सर्वपक्षीय बैठकीला  विरोधक उपस्थित नव्हते. सत्ताधारी आणि विरोधक टोलवाटोलवी करतायेत. आम्ही समाजाचं काम करतोय. आम्ही आमदारकी, खासदारकीसाठी भांडत नाही, मराठा समाजाला ओबीसीतू आरक्षण मिळावं यासाठी भांडतोय असंही मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी म्हटलं.जोपर्यंत उद्धव ठाकरे आमचं निवेदन घेत नाहीत तोवर आम्ही इथेच ठिय्या मांडू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला. 

टॅग्स :मराठा आरक्षणओबीसी आरक्षणउद्धव ठाकरेअंबादास दानवेभाजपामनोज जरांगे-पाटील