मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन, दादरमध्ये आज अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:57 AM2023-02-08T06:57:33+5:302023-02-08T06:57:59+5:30
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार (८२ वर्षे) यांचे मंगळवारी संध्याकाळी कोकणातून मुंबईत परत येत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष, तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार (८२ वर्षे) यांचे मंगळवारी संध्याकाळी कोकणातून मुंबईत परत येत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठा चळवळीतील हुशार व संयमी नेता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. रत्नागिरी मराठा बिझनेसमेन फोरमच्या बैठकीसाठी रविवारी ते मुंबईहून तेथे गेले होते.
मंगळवारी संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, तसेच वीरेंद्र व योगेश पवार ही दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मताचे ते होते. त्यासाठी या वयातही त्यांनी आंदोलन केले. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरू असून, त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते.