मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:52 PM2023-11-21T17:52:31+5:302023-11-21T17:58:33+5:30
राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळा दिला असून आता जरांगे पाटील यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीनेही काम सुरू केले आहे. राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले होते. यावेळी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मध्यस्ती केली होती, आता आरक्षणावरुन बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. आमदार बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रातील सगळेच मराठा कुणबी आहेत. आता याच्या नोंदी सापडत आहेत. मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत मी मध्यस्ती केली होती. २४ डिसेंबरच्या आत आरक्षणाचे काम केले पाहिजे, नाही तर आम्हालाही यात उतरावे लागेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.
"मुख्यमंत्र्याकडे मी आरक्षणाबाबत एक महिन्याचा अहवालाची मागणी करणार आहे. सरकारला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार, त्यांनी आरक्षणाचे काम केले नाहीतर रस्त्यावर उतरणार आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर
होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे. त्यांनी काय चूक केली, त्यांनी बरोबर सांगितले. माझ्या पाठिशी मराठा समाजाची, सामान्य मराठ्याची शक्ती आहे. दुसरी कोणतीही शक्ती माझ्यासमोर टिकणार नाही. मराठा समाजाशी वेदना आणि भावना मांडत आहे. इथे लिहून देणारा कुणी नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
मनोज जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर असून, पुणे, कल्याण येथून ते ठाण्यात आले आहेत. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांना राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी बोलताना सदर भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे मांडली. तसेच सामान्य मराठे हा लढा जिंकणार आहे. सामान्य मराठे आहेत, म्हणूनच हा लढा इथपर्यंत आला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १०० टक्के २४ डिसेंबरच्या आधी मराठा समाजाला आरक्षण देतील. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट करू. सरकारकडून आम्हाला आशा आहे आणि सरकारवर विश्वासही आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.