Join us

...तर 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 8:05 PM

महाराष्ट्र बंदमधील गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील शेकडो गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास २७ ऑक्टोक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी आणि चारचाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बंदच्या नियोजनात असलेल्या कार्यकर्त्यांविरोधातही गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा क्रांती मोर्चातर्फे काढलेल्या मोर्चाच्या नियोजन बैठकीला उपस्थित असलेल्या, सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या ग्रुपचे सदस्य असलेल्या सुशिक्षित तरूणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. बंददरम्यान कोणताही हिंसाचार केलेला नसतानाही, मागील संदर्भ लक्षात घेऊन पोलिसांनी सरसकट गुन्हे दाखल केल्याचा आरोपही समन्वयकांनी केला. आत्तापर्यंत अशा प्रकारचे साडेतीन हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा २७ ऑक्टोबरला हजारो दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या माध्यमातून मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा समन्वयकांनी दिला आहे.

गुन्हेगार होण्यास भाग पाडू नका!डॉक्टर, वकील आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरूणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे एका पिढीचे आयुष्य वाया जाण्याची भीती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली. त्यामुळे हे गुन्हे रद्द झाले नाही, तर भविष्यातील आंदोलनात हेच तरूण हिंसेचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही क्रांती मोर्चाने दिला आहे. आरक्षण न देणाऱ्या सरकारने किमान तरूणांना गुन्हेगार होण्यास भाग पाडू नये, असे आवाहन संघटनेने केले आहे. 

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चामराठा आरक्षणमराठा