नवी दिल्ली - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच आरक्षणासंदर्भातील टक्केवारीत वाढ करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण संसदेत हा मुद्दा उचलून धरणार आहोत. आरक्षण हे 50 ते 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी संसदेत चर्चा करणार असून तसा कायदा होणे गरजेचे असल्याचेही आठवले यांनी म्हटले.
मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या रामदास आठवलेंनी मराठा आंदोलकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तर मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबाही दर्शवला. तसेच मराठा आंदोलकांनी शांतपणे आपल्या मागण्या मागाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले असून त्यास काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड येथेही बंद पुकारण्यात आला आहे. साताऱ्यात पोलिसांवर दगडफेकेची घटना घडली. त्यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. राज्यात तीव्र होत असलेल्या आंदोलनानंतर राजधानी दिल्लीतून रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.