मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न; आरक्षण लढाईसाठी ३ मोठे निर्णय घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 08:56 PM2023-11-05T20:56:47+5:302023-11-05T20:57:22+5:30
जातनिहाय जनगणनेबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदारांना निवेदन देण्यात येतील असं मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ठरलं आहे.
मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं पुन्हा हा प्रश्न चर्चेत आला. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतु मराठा समाजाकडून आरक्षणाच्या पुढील लढाईचं नियोजन सुरू झाले आहे. आरक्षणाच्या लढाईत सातत्य असले पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होते, त्यानुसार मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. त्यात ३ ठराव समंत करण्यात आले आहेत.
या बैठकीबाबत मराठा समन्वयक म्हणाले की, जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले, त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. सरकारने मराठा समाजाला ठोस काहीतरी द्यावे, नाहीतर पुढील नियोजनासाठी मुंबई सज्ज आहे. आज प्राथमिक बैठक पार पडली. त्यात ३ ठराव झालेत. जरांगे पाटील यांची दिवाळीनंतर भेट घेऊ. मुंबईकर म्हणून आम्ही सज्ज आहोत हा पहिला ठराव, दीड महिन्याच्या कालावधीत मराठा जोडो अभियान सुरू करत सकल मराठा समाज नोंदणी करू हा दुसरा ठराव आणि तिसऱ्यात ठरावात बिहारमध्ये सरकारने जातीनिहाय जणगणना सुरू केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी मराठा समाजाने केली.
तसेच जातनिहाय जनगणनेबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदारांना निवेदन देण्यात येतील. मराठा आंदोलन स्थगित झाले आहे परंतु थांबले नाही. आजच्या प्राथमिक बैठकीत मुंबईकर म्हणून आम्ही सज्ज आहोत. मुंबईच्या आर्थिक नाड्या कशा आवळायच्या याचा गनिमी काव्याने दाखवून देऊ. सरकारने आरक्षण नाही दिले तर काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
दरम्यान, मराठा जोडो अभियानासाठी वेबसाईट, टोल फ्री नंबरही देणार आहोत. २०१६ पासून मराठा मोर्चाला सुरुवात झाली तेव्हापासून शिवाजी मंदिर इथेच संपर्क कार्यालय आहे. ज्यांना ज्यांना यायचे असेल त्यांनी इथेच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना भेटावे असं आवाहनही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला इशारा देत १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू आहे. आमचे आंदोलन संपले नाही. जोवर मराठा आरक्षण मिळणार नाही तोवर लढाई सुरूच राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.