मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (23 जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून सातारा, पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.
तरुणाने घेतली जलसमाधी
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात तरुणानं गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्यानंतर सकल मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. सोमवारी (23 जुलै)सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली. तेथे पोलीस व आंदोलकांमध्ये वाद झाला. गोंधळातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 26 वर्ष) यानं दुपारी आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पाण्यात उडी घेतली.
Live Updates:
- औरंगाबाद : कायगाव टोका येथील आंदोलन अखेर मागे, काल दुपारपासून पुलावर सुरू होते आंदोलन
- सोलापूर - राज्यातील 175 मराठा आमदारांचा बार्शीत मराठा समाजाने केला निषेध, गाढव आणून ठिय्या आंदोलनात केला निषेध
-सोलापूर : राज्यातील मंत्र्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार, सोलापुरातील पोलीस सूत्रांनी दिली माहिती
- आज संध्याकाळी सायंकाळी ६.३० वाजता चेंबूर येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाठिकाणी काकासाहेब शिंदे यांची श्रद्धांजली सभा पार पडेल
- शाळा व महाविद्यालयांना बंदमधून सूट देण्यावरून बैठकीत वाद
- खासगी वाहने मात्र रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे स्पष्टीकरण
- दहावी व बारावीची फेर परीक्षा असल्याने शाळा व महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आले
- मेगाभरती तत्काळ थांबवा आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
- अत्यावश्यक सेवा, शाळांच्या बसेस, दूध गाड्या वगळल्या
- ज्यांना सहानुभूति आहे, त्यांना बंदला प्रतिसाद द्यावा
- बुधवारी बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसा होणार नाही. तोडफोड न करण्याचे आवाहन पवार यांनी केले
- मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रने काल बंदची घोषणा केली. वारकऱ्यांसाठी आज संप पुकारला नाही
- शांत पद्धतीने होणारे हे शेवटचे आंदोलन, त्यानंतर सरकारला मराठा क्रांति मोर्चाची धग पाहावी लागेल, असा इशारा नवी मुंबईच्या समन्वयकांनी दिला
- असे मराठा क्रांति मोर्चाचे सैनिक बलिदान देत राहिले, तर संघटनेकडे फक्त गाजर राहतील
- मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव यावेळी मंजूर
- मराठा क्रांती मोर्चाची मुंबईतील बैठक संपन्न, बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई बंद
- लातूर शहरात मराठा क्रांती मार्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्फुर्त प्रतिसाद
- नांदेड : पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर आंदोलकांची दगडफेक
- जालना : आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढली मुख्यमंत्री, आमदार व खासदार यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
- औरंगाबाद : कायगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या शाम कारगावकर या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
- बीड : काकासाहेब शिंदेच्या मृत्यूला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, आडस पोलीस स्टेशनमध्ये राम माने यांची तक्रार दाखल
- औरंगाबाद : वाळूज येथे बंदला हिंसक वळण, दुचाकी शोरूमवर दगडफेक, मोरे चौक व रांजणगाव येथे ५ रिक्षा फोडल्या
- नाशिक : काही वेळातच शहरातील जत्रा हॉटेलजवळ मुंबई आग्रा महामार्गावर मराठा संघटना रास्ता रोको करणार
- औरंगाबाद : कायगाव पुलाजवळ आंदोलकांनी फायर ब्रिगेडची गाडी पेटवली
- हिंगोली-नांदेड मार्गावरील खानापूर व सावरखेडा या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन
- मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं, तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न
- लातूरमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
- औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांचा मराठा आंदोलनादरम्यान विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
- महाराष्ट्र बंदच्या हाकेला हिंगोलीत प्रतिसाद, खानापूर येथे पोलीस जीप पेटवली
- सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर आदी तालुक्यात मराठा समाज आक्रमक, ठिकठिकाणी मोर्चा, दगडफेक, रास्ता रोको आंदोलन सुरू
- बीड : पाटोदा तालुका शंभर टक्के बंद, बस वाहतूक बाजारपेठा बंद, आंदोलकांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरु
- नवी मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवारी ( 24 जुलै ) नवी मुंबई बंदची घोषणा, या बंदमधून एपीएमसीच्या भाजी पाला मार्केट, शाळा व रुग्णालये वगळण्यात आली आहेत.
- अहमदनगर: शेवगाव येथे बंदला हिंसक वळण, क्रांती चौकात टायर जाळले
- उमरगा येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू असताना आलेल्या एका रुग्णवाहिकेस रस्ता करून देण्यात आला
- मराठा आंदोलनातील आणखी एका तरूणाची नदीत उडी, देवगांव रंगारी येथील घटना, गुड्डू सोनावणे गंभीर जखमी
- उस्मानाबादमध्ये बस स्थानकाजवळ व लातूर रोडवर दगडफेक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, टायर जाळून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी
- काही पेड लोक आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे: चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
- अहमदनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, संगमनेरमध्ये बस जाळली, अहमदनगर- औरंगाबाद महामार्ग ठप्पच
- सांगली : सकल मराठा समाजाच्या वतीने विटा बंदला उस्फूर्त प्रतिसाद, शहरात कडकडीत बंद, विटा बंदच्या आवाहनासाठी हजारो युवक रस्त्यावर
- मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मराठवाड्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद
औरंगाबाद: काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर, शिंदेंच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणार.
औरंगाबाद : काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला दोघे निलंबित
औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर गंगापूर पोलीस स्टेशनसमोरील ठिय्या आंदोलन मागे
औरंगाबाद - पुणे महामार्गावर मोर्चेकऱ्यांचा ठिय्या
नवी मुंबई : कामोठे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळले
- सोलापूर-तुळजापूर रोडवरील पर्ल गार्डन समोर एसटी बस वर दगडफेक, दोन बसचे नुकसान