Join us

मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 6:28 AM

आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन काय उपयाेग? तुम्ही दम धरा - मनोज जरांगे पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुरुवारी पत्र परिषदेत व्यक्त केले. 

राणे म्हणाले की, राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे  म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे  म्हणणे योग्य ठरणार नाही.    

आमचे बळी पडायला लागलेत : जरांगे सरकारमुळे आमचे बळी पडायला लागले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणखी थोडे दिवस दम धरा. आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन काय उपयाेग? तुम्ही दम धरा, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

सुनील कावळे यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत तसेच मुलाला सरकारी नोकरी दिली जाईल. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कोणीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये.- दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई

टॅग्स :नारायण राणे मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षण