मुंबई: मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा कुणबी आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सगेसोयरे अधिसूचनेवरही काम सुरू असून शनिवार, रविवार, सोमवार या सलग सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. २६६ अधिकारी व कर्मचारी यावर काम करत आहेत.
सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये सगेसोयरे दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसूचना २६ जानेवारीला प्रसिद्ध केली. त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती/ सूचना मागविल्या होत्या. त्याअनुषंगाने सुमारे ४ लाख हरकती सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे (डाटा) वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हरकत घेणाऱ्या अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, गाव तालुका जिल्हा यासंबंधीची माहिती संकलित करण्यात येत आहे.
■ शासकीय सुटीच्या दिवशी मंत्रालयातील
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग विभागाची कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहेत. • सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे या कामाचा सतत आढावा घेत आहेत.
व्हिडीओ चित्रीकरण
विशेष म्हणजे, या सर्व कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे. सुटीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थितीत कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून भोजनगृह सुरू ठेवण्यात आले. मंत्रालयातील प्रवेशद्वारावरील मध्यवर्ती टपाल कक्षदेखील सुरु ठेवण्यात आला आहे.