मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आता पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र सुरू झालं आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुसरीकडे मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. या आरक्षणाच्या लढ्यात आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी उडी घेतलीय.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे, असे म्हणत पार्थ यांनी मराठा नेत्यांना जागं होण्याची, संघर्ष करण्याची गरज असल्याच म्हटलंय. बीड तालुक्यातील केतूरा गावात 18 वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेतील मृत तरुणाचा फोटो आणि त्याने लिहिलेली चिठ्ठी शेअर करत, पार्थ पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जागं होण्याचं आवाहन केलंय.
विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पीढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सध्यातरी, मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी या पेटलेल्या मशालीला स्वत:च्या ह्रदयात स्थान देऊन विवेक आणि कोट्यवधी असहाय विवेक यांच्या न्यायासाठी दरवाजे ठोठावणार असल्याचे पार्थ यांनी म्हटले आहे. पार्थ यांनी आपल्या ट्विटर अकांऊंटवरुन सरकारलाही लक्ष्य केलंय.
दरम्यान मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. अशातच EWS च्या मुद्द्यावरुन मराठा समाजात मतभेद असल्याचं समोर आलं आहे. EWS चा मराठा समाजाला फायदा करुन घेतला पाहिजे असा ठराव गोलमेज परिषदेत पास करुन घेतला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कोर्टाकडून उठत नाही, तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली. याबाबत सुरेश पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीराजेंनी काही संघटनांचे ऐकून EWS आम्हाला नको अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली, ती भूमिका चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणात कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने समाज आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाजासमोरील ताट काढून घेतलं आहे त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी मराठा गोलमेज परिषदेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं त्यांनी सांगितले.