मुंबई - मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील आंदोलन राज्यव्यापी असले, तरी त्याचा रोख मुंबई असेल, अशी माहिती मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली.सकपाळ म्हणाले की, २ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात क्रांती मोर्चाचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या घरात सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी होत आहे. म्हणून क्रांती मोर्चाही यंदा काळी दिवाळी साजरी करत आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितल्याने, तोपर्यंत बेमुदत उपोषणाद्वारे इतर मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत पाच आंदोलकांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र, ढिम्म सरकार मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. याचे परिणाम सरकारला दिवाळीनंतर भोगावे लागतील, असा इशाराही सकपाळ यांनी दिला आहे.समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजातील काही समन्वयकांना हाताशी घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतर विविध ठिकाणी आंदोलनांची घोषणा केली जात आहे. मुंबईमध्ये निर्णायक आंदोलन होऊ नये, म्हणून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र, आरक्षण आणि इतर मागण्यांची पूर्तता होत नसल्याने, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडलेला ग्रामीण भागातील मराठा समाज दिवाळीनंतर मुंबईत एकवटेल. व्यूहरचना आखली जात असून, दिवाळीनंतर मुंबईत मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसेल.गुराढोरांसह मुंबईत येणारआर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी सरकारी योजनांअभावी होरपळत आहे. म्हणूनच गुराढोरांसह आणि शेती साहित्य घेऊनच१५ नोव्हेंबरनंतर मराठा शेतकरी आणि शेतमजूर मुंबईवर धडक देईल, असे सकल मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले.
‘मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर क्रांती मोर्चा होणार आक्रमक’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 5:51 AM