लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठा - ओबीसी समाजात वाद निर्माण होऊ नये, दोन्ही समाजात सलोखा राहावा, यासाठी मराठा आणि ओबीसी समाजातील काही नेत्यांनी एकत्र येत प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठा - ओबीसी समाजाची बैठक पार पडली.
बैठकीला संभाजीराजे छत्रपती, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह दोन्ही समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. मराठा - ओबीसी म्हणजे इंडिया - पाकिस्तानचे लोक नाहीत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, विविध संतांनी संस्कार दिले. अशा राज्यात वातावरण पेटले तर ते राज्याला परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाबाबत लवकर तोडगा काढावा, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली.
छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या स्तरावरील भाषण केले. मी भुजबळांना काही वर्षांपूर्वी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणालो होतो, त्याची मला लाज वाटते, अशा शब्दांत संभाजीराजेंनी भुजबळांचा समाचार घेतला.
जे बारा बलुतेदार आरक्षणाबाहेर आहेत, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा, असे सांगत रोहिणी आयोग लागू करण्यासाठी आपण दिल्लीत एकत्र मोर्चे काढू.- हरिभाऊ राठोड, ओबीसी नेते
मोठा भाऊ मराठा आहे, छोटा भाऊ ओबीसी आहे. आम्ही भाऊबंद आहोत, आज एकत्र आहोत, उद्याही एकत्र राहू. - संभाजीराजे छत्रपती