मराठा संघटना हल्लेखोर तरुणाच्या पाठीशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 05:04 AM2018-12-11T05:04:25+5:302018-12-11T05:04:42+5:30
सदावर्तेंवर घटनेचे खापर; तेढ निर्माण करत असल्याचाही आरोप
मुंबई : मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यानेच हा हल्ला झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे, तसेच न्यायालयाच्या आवारात वकिलांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचाही क्रांती मोर्चा व ठोक मोर्चाने निषेध व्यक्त केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर म्हणाले की, मुळात ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देणाºया युवकाला सदावर्ते यांच्या चार सहकारी वकिलांनी मारहाण केली. कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे मारहाण करत असतील, तर सर्वसामान्य तरुणाला दोष कसा देणार? न्यायालयात याचिका असताना, सदावर्ते सोशल मीडियासह माध्यमांसमोर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळेच संबंधित तरुणाने वैयक्तिक रागातून हा प्रकार केला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या तरुणाच्या पाठिशी राहणार असल्याचे पोखरकर यांनी सांगितले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील म्हणाले की, संबंध नसताना उदयनराजेंपासून समाजावर गंभीर आरोप करण्याचे काम सदावर्ते करत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच हे प्रकरण घडले आहे. कायदेशीर मार्गाने त्यांनी त्यांचा विरोध नोंदवावा. मात्र, कायद्याच्या नावाखाली कोणतेही आरोप समाज सहन करणार नाही. हल्ला करणाºया तरुणाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. राज्यात मराठा समाजातील शेतकºयांपासून तरुणांनी केलेल्या आत्महत्या पाहिल्यानंतरही वादग्रस्त वक्तव्य करणाºया सदावर्ते यांच्याविरोधात तरुणांमधून रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे. ठोक मोर्चा या तरुणाच्या पाठिशी उभा राहून न्याय मिळवून देईल.
कायदेशीर मदत पुरविणार
सरकारची भूमिका आणि सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे हा हल्ला झाला आहे. हल्ल्याचे समर्थन करत नसलो, तरी ज्या कारणांमुळे हल्ला झाला आहे, ते नक्कीच समर्थनीय आहे. त्यामुळे सरकारने भक्कम बाजू मांडताना सदावर्ते यांनीही वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे. संभाजी ब्रिगेड संबंधित तरुणाला आवश्यक कायदेशीर मदत पुरविणार आहे.
-दिनेश महाडिक, मुंबई प्रदेश अध्यक्ष-संभाजी ब्रिगेड.