Join us  

मराठा रेजीमेंट कोकणसाठी सज्ज

By admin | Published: June 18, 2014 11:59 PM

१९८९ पासून या सर्व गावांतील शेकडो कुटुंबांनी निसर्गिक आपत्तीचे रौद्ररुप,कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी, जीवितहानी अनुभवली आहे.

जयंत धुळप, अलिबागपाऊस म्हटला की सर्वांनाच हवाहवासा वाटला तरी सुमारे ७२० किमीच्या किनारपट्टीवर वसलेल्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी आणि सह्याद्री डोंगर रांगांना खेटून असलेल्या शेकडो गावांतील कुटुंबांना आजही धस्स होते. १९८९ पासून या सर्व गावांतील शेकडो कुटुंबांनी निसर्गिक आपत्तीचे रौद्ररुप, त्यात झालेला विध्वंस, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची-शेतीची हानी आणि जीवितहानी अनुभवली आहे. यंदा त्या घटनेस तब्बल २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आपत्ती नियोजन आणि राज्याच्या आपत्ती नियोजन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील संभाव्य आपत्ती नियोजनात थेट भारतीय लष्कराला सहभागी करुन घेण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ््यातील संभाव्य आपत्ती नियोजनाकरिता कोकण विभागाची जबाबदारी पुण्यातील औंध आर्मी कॅम्पमधील मराठा रेजीमेंटकडे सोपविण्यात आली आहे.कोकणातील आपत्ती व्यवस्थापनासाठी भारतीय लष्कराने परिसरातील नद्या, खाड्या, दरड कोसळण्याचा धोका असणारे डोंगर, धोकादायक रसायन निर्मितीचे कारखाने यांचा संपूर्ण तपशील अभ्यासून, गेल्या चार दिवसांपूर्वी संपूर्ण कोकण विभागाची ‘रेकी’ म्हणजे नियोजन पूर्व सर्वेक्षण केले आहे आणि त्याप्रमाणे आपत्ती नियंत्रण आराखडा तयार केला आहे. ‘रेकी’चे हे काम भारतीय लष्करातील कॅप्टन विनोद बालन यांच्या नेतृत्वाखालील मराठा रेजीमेंटचे सुभेदार सदानंद मोरे यांच्या विशेष लष्करी पथकाने केले. या पथकास रायगडचा भूगोल आणि आपत्तीचा पूर्वइतिहास अवगत करुन देण्याची जबाबदारी रायगड जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी सागर पाठक यांनी पार पाडली.या पथकाने रायगड जिल्ह्यात नागोठणे, महाडसह अन्य ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ही रेकी केली. आपत्तीकाळात रस्ते बंद झाल्यावर, जिल्ह्यातील खाड्या व नदी पात्रांचा वापर करुन स्पीडबोटचा वापर करुन आपदग्रस्त गावांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग या पथकाने निश्चित केले आहे. पुण्यातून निघून अल्पवधीत ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचण्याचे जवळचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. २००५ मधील कोकणातील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटात दरडी कोसळल्याने लष्कराची वाहने रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये पोहोचू शकली नव्हती. या ताफ्यास चिपळूण मार्गे रायगड जिल्ह्यात यावे लागले होते. यामध्ये तब्बल ७२ तासांचा विलंब लागला होता. कोकणातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत लष्कराचा नियोजन आराखडा येत्या आठ दिवसांत तयार होणे अपेक्षित आहे. अरबी समुद्राची सीमा ही एकमेव सीमा अशी आहे, की जिथे भारतीय लष्कराचा कोठेही तळ नाही. सागरी सीमा सुरक्षेची जबाबदारी स्थानिक जिल्हा पोलीस, तटरक्षक दल आणि भारतीय नौदल यांच्याकडे संयुक्तरीत्या सोपवलेली असली तरी या संयुक्त यंत्रणेच्या माध्यमातून होणारी सागरी गस्ती ही पावसाळ््यात पूर्णपणे बंद असते. अशा वेळी लष्करास कोकणात पोहोचण्यासाठी किनारी भागातून सक्षम रस्ते असले पाहिजेत याच गरजेतून सागरी महामार्गाची निर्मिती करण्यात आली असली तरी यात अडथळे आहेत.