Maratha Reservation - सकल मराठा समाजाचे आवाहन, राज्यात उद्यापासून जेलभरो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 05:08 PM2018-07-31T17:08:06+5:302018-07-31T17:09:11+5:30
Maratha Reservation: सकल मराठा समजाच्यावतीने उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा घडवून आणण्यामागे मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आहे,
मुंबई - सकल मराठा समजाच्यावतीने उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा घडवून आणण्यामागे मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आहे. यावरुन त्यांना राज्यात अराजकता ठेवण्यात जास्त रस आहे, असा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे. तसेच मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 1 ऑगस्टला जेल भरो आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.
सकल मराठा समाजाकडून उद्या जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या आहेत.
आंदोलनातील मागण्या पुढील प्रमाणे आहेत :
* 25 जुलै बंद दरम्यान दाखल केलेले सरसटक खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
* कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, व त्यांना त्वरीत निलंबित करावे.
* समाजासाठी ज्यांनी प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी 50 लाख रुपये व जखमींना 10 लाख रुपये देण्यात यावेत.
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम कदम यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंद दरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा.
दरम्यान, या मागण्या घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट 2018 पासून जेल भरो आंदोलन सुरू होईल, असे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले आहे.