मुंबई - मराठा आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळ अधिवेशनाच्या उद्याच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात येणार होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक आजच विधिमंडळात मांडले जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एटीआर म्हणजेच कृती अहवाल सादर केला आहे. तर दुपारी विधेयक मांडले जाईल, अशी माहिती लोकमतच्या सूत्रांनी दिली.
(दोन दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर तुमचा निकाल लावू!)
राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जो अहवाल राज्य सरकारला दिला आहे, तो अहवाल सरकार विधिमंडळात मांडणार नाही. हे आधीच स्पष्ट झाले आहे. मात्र या अहवालावर राज्य सरकारनं ठरावयाच्या कार्यवाहीबाबतचा कृती अहवाल आज सभागृहासमोर येईल. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, या कृती अहवालावर कुठलीही चर्चा सभागृहात होणार नाही. अहवाल मांडून पुढचे कामकाज पूर्ण करायचे, अशी रणनीती सरकारनं आखली आहे.
('ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या')
मराठा समाजाच्या आरक्षणाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आतापर्यंत आठ बैठकी झाल्या आहेत. या समितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन तित आरक्षण विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर विधेयक विधिमंडळात मांडले जाईल.