Maratha Reservation: मराठा आरक्षणात केंद्राची काहीच भूमिका नाही! भाजपचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:55 IST2021-05-25T08:54:36+5:302021-05-25T08:55:28+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Maratha Reservation: मराठा आरक्षणात केंद्राची काहीच भूमिका नाही! भाजपचा दावा
पुणे : मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
पुण्यात क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, भाजपचा आरक्षणाच्या सकारात्मक निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाबाबत जे काही सकारात्मक आणि रचनात्मक निर्णय होतील, त्यामागे भाजप पूर्णपणे ताकदीने उभा असेल.
आरक्षणाचा मुद्दा खूप वर्षांपासून चालतो आहे. सरकारला आरक्षण देण्याबाबत अनेक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागत होते. ते मिळत नसल्याने त्यावर मलमपट्टी होईल म्हणून काही योजना चालू केल्या. यात सारथी संस्थेचा समावेश होता. मात्र आमची सत्ता गेल्यानंतर सारथीचे नाव कुठेही दिसून आले नाही. सत्तेतील नेत्यांकडे विचारणा केली, तेव्हा ते एकमेकांकडे बोट दाखवू लागले. सारथी संस्थेची वाट लावून टाकली, असा आरोप पाटील यांनी केला.
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून भेट मागितली होती. मात्र, त्यांना अजूनही भेटीची तारीख न मिळाल्याने त्यांनी यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली होती.
विद्यमान सरकारने ‘अमृत’ कार्यान्वित करावे
आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना रोजगार, शिक्षण संधी देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अमृत महामंडळ फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने स्थापन केले. हा विषय मंत्रिमंडळ मान्यतेसाठी येणार तितक्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर विश्वासघातामुळे भाजप सरकार गेले, अन् महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, असे पाटील म्हणाले. विद्यमान सरकारने अमृत कार्यान्वित करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले.