Join us

मराठा आरक्षण: 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला उतरती कळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:55 AM

याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद

मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक घडी नीट बसविली होती. मात्र, शिवाजी महाराजांच्या पश्चात या समाजाला प्रणेता मिळाला नाही. त्यामुळे या समाजाला उतरती कळा लागली. स्वातंत्र्यानंतर तर हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मागासलेला राहिला,’ असा युक्तिवाद मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मंगळवारी केला.मराठा आणि कुणबी समाज एकच असला, तरी या दोन्ही समाजांच्या चालीरीती व राहणीमानात बराच फरक आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला. आजही मराठा समाजात कुणबी घरातील मुली स्वीकारल्या जात नाहीत व कुणबी समाजात मराठा समाजाच्या मुली स्वीकारल्या जात नाहीत, असा युक्तिवाद याचिकाकर्ते वैभव कदम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आरिफ बुकवाला यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजाची आर्थिक व सामाजिक घडी नीट बसविली होती. मात्र, त्यांच्यानंतर या समाजाला उतरती कळा लागली आणि ती आजतागायत कायम आहे. या समाजाचे आर्थिक स्थैर्य गेले. परिणामी, शैक्षणिक व सामाजिक मागसलेपण आले. आजही मराठा समाज शेतात राबत आहे, परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळत नसल्याने या समाजातील लोकांना आत्महत्या करावी लागत आहे, असे बुकवाला यांनी न्यायालयाला सांगितले.सुनावणी आजही राहणार सुरूस्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली, तरी या समाजाकडे ‘मागासलेला समाज’ म्हणून पाहण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची होरपळ सुरूच राहिली. त्यामुळे आम्हाला आरक्षण हवे, असे बुकवाला यांनी न्यायालयाला सांगितले. बुधवारीही या याचिकांवर सुनावणी सुरूच राहणार आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमराठा आरक्षण