Join us

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 4:53 PM

गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाल्याची चर्चा आहे. तसेच सरकारनं आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घेण्यासही सहमती दर्शवली आहे.या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, शरद रणपिसे, अनिल परब, कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घ्या, मेघाभरतीबाबत भूमिका स्पष्ट करा, विभागनिहाय जागा, राखीव जागांबाबतचा तपशील 2 दिवसांत जाहीर करा, आरक्षणाबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, मराठ्यांवर  खोटे गुन्हे दाखल करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी, मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्याच्या आत घ्या, त्या आधारे 16 % आरक्षण द्या आणि ते आरक्षण घटनेच्या 9व्या परिशिष्टात टाकण्यासाठी घटनादुरुस्ती करा म्हणजे ते न्यायालय रद्द करू शकणार नाही, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी बैठकीत विरोधकांनी केली आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा