छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानातील मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच, आज सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली.
वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसेपाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
आंदोलनास भाजपचा पाठिंबा
संभाजीराजेंच्या आंदोलनात भाजपानेही पाठिंबा दिला आहे. संभाजीराजेंच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपा पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले. मराठा समाजासाठी भाजपाच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजपा असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल.