Join us  

ठरलं! मनोज जरांगे लवकरच मुंबईत धडकणार; ‘या’ दिवशी मराठा समाजाशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:13 AM

Manoj Jarange Patil Mumbai Visit: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता दुसऱ्या टप्प्यातील दौरा काढणार आहेत.

Manoj Jarange Patil Mumbai Visit:मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आता नेतृत्व करत आहेत. जालना येथे मराठा समाजाची अतिविशाल सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या सभेत जरांगे पाटील यांनी सरकारला आता फक्त १० दिवसांची मुदत उरली असल्याचा इशारा दिला होता. या सभेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मनोज जरांगे आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, जरांगे पाटील लवकरच मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे यांच्या  मुंबई भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली असल्याचे म्हटले जात आहे. 

आम्ही आरक्षणाचे निकष पूर्ण केले आहेत. व्यवसायानुसार शेती आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठ्यांना हक्काचे आरक्षण देण्यात नेमकी अडचण काय असे अनेक मंत्र्यांना विचारले; विचारून सांगतो असे म्हणतात आणि ते माघारी येतच नाहीत. १८ ऑक्टोबरपासून राज्यात दुसऱ्या टप्प्यातील दौरा काढणार आहे. मुंबई, पुणे, बारामती, मावळ, फलटण भागांत दौरे होतील. आम्हाला २४ ऑक्टोबरच्या आत आरक्षण पाहिजे, असा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

१८ किंवा १९ ऑक्टोबरला मनोज जरांगे मुंबईत येणार

मराठा आरक्षणाप्रश्नी उभ्या राज्याचे लक्ष वेधून घेणारे मनोज जरांगे पाटील हे लवकरच मुंबईत येणार आहेत. येत्या १८ किंवा १९ ऑक्टोबरला ते शिवाजी मंदिर येथून मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून आरक्षण देण्यात यावे, ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे.  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यास होकार दिला आहे. यावर, पुढील आठ दिवसांत आरक्षणाचा पेच सोडविणार की ठेवणार हा प्रश्न सरकारचा आहे. व्यवसायाधारित जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असल्यामुळे कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी आमची मागणी आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही अन् कानात कुजबूज करू दिली नाही. समाजाशी गद्दारी न केल्यामुळे लाखो लोकांचे पाठबळ मिळत आहे. आंदोलनाचा रथ पुढे गेला असून, मराठा आरक्षणाशिवाय माघार नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :मराठा आरक्षण