Join us

मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या; बच्चू कडूंची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 12:49 PM

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक झाल्याचे दिसून आले.

मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वातावरण पेटलं आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केले आहे. मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. या बैठकीत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगत सरसकट आरक्षण द्या अशी मागणी केल्याचे पुढे आले आहे.

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलं  तर केंद्र आणि राज्य सरकारने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यातच अनेक नेत्यांकडून आरक्षण प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात येत होती. तेव्हा महाधिवक्त्यांकडून विशेष अधिवेशनाने आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही असं मत मांडले. त्यानंतर नेते आक्रमक झाले.

तर सुप्रीम कोर्टात सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. आधीच्या आरक्षणातील काही त्रुटी काढून आरक्षण देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला. तर आरक्षणप्रश्नी राज्याने केंद्र सरकारशी संपर्क केलाय का?, या प्रश्नावर केंद्र काही मदत करणार आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला. तर मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी बैठकीत मांडले. त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हाताळण्यास सरकार कमी पडलं. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने तोडगा काढावा अशी मागणीही चव्हाण यांनी सरकारला केली.

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेवर सरकारने ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. मराठा आरक्षणावर अंतिम डेटा तयार करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. एकीकडे मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक सुरू असताना दुसरीकडे मंत्रालयात सर्वपक्षीय मराठा समाजाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत मंत्रालयाला टाळे ठोकले. आजपर्यंत मंत्रालयात सामान्य नागरिक आंदोलन करताना दिसले. अनेकांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्याही मारल्या होत्या. परंतु पहिल्यांदाच मराठा आरक्षणावर आमदारांनी एकत्र येत मंत्रालयाला टाळे ठोकले. पोलिसांनी तात्काळ टाळे उघडले आणि आक्रमक झालेल्या आमदारांना ताब्यात घेतले.

 

टॅग्स :मराठा आरक्षणबच्चू कडूअंबादास दानवेविजय वडेट्टीवार