सदावर्तेंच्या कार तोडफोडीचे मातोश्री कनेक्शन?, आंदोलक मंगेश साबळे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:43 PM2023-10-27T16:43:13+5:302023-10-27T16:44:49+5:30
कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या बंगल्यावर, घरावर, फोनवर आमचे बोलणे झाले नाही असं मंगेश साबळेंनी स्पष्ट केले.
मुंबई – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा देत सरपंच मंगेश साबळेसह २-३ तरुणांनी लोअर परळ येथील सदावर्तेच्या इमारतीबाहेर उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या काचा फोडल्या. या मराठा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु ही मुलं रात्री मातोश्रीवर होती असा आरोप भाजपा आमदार नितेश राणेंनी केला. त्यावर आंदोलक मंगेश साबळे यांनी उत्तर दिले आहे.
मंगेश साबळे म्हणाले की, नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांचे मराठा समाजासाठी काम खूप मोठे आहे. मी जवळून पाहिले आहे. मी एक दिडवर्षापूर्वी नितेश राणेंना भेटलो होतो. त्यांच्याशी आरक्षणावर चर्चाही झाली. माझ्या आईची आण खाऊन सांगतो, मी मातोश्रीवर नव्हतो. या गोष्टीला राजकीय वळण देऊ नये. माझा कुठल्याही पक्षाशी आणि राजकीय नेत्याची संबंध नाही. माझ्या मराठा समाजातील मुले आत्महत्या करतायेत. त्यात सदावर्ते आमच्या जखमेवर मीठ चोळतायेत. त्याला दिलेले हे उत्तर आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या बंगल्यावर, घरावर, फोनवर आमचे बोलणे झाले नाही. हा आमच्या भावनांचा उद्रेक आहे. आमचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासावे. आम्ही रात्री मुंबईला गेलो, लॉजवर गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता आम्ही गाड्या फोडल्या. मनोज जरांगे यांनी दिलेले विधान ऐकून वाईट वाटलं. आम्ही कायदा तोडला आम्हाला मान्य आहे. पण आमचे बांधव आत्महत्या करतायेत. त्यांना बळ मिळावे म्हणून हे कृत्य केले असं स्पष्टपणे मंगेश साबळेंनी सांगितले.
दरम्यान, ३३ वर्षापासून मराठ्यांचे शांततेत आंदोलन सुरू आहे. अनेकांचे बळी गेलेत. त्यांच्या घरी जाऊन कुणी अश्रू पुसायला तयार नाही. मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रकार आहे बोलले जाते. आरक्षण द्या अन्यथा आंदोलनाला उग्र स्वरुप लागेल असा इशारा आधीच दिला होता. त्यामुळे हे आंदोलन केले असं मंगेश साबळेंनी म्हटलं.