Join us

Maratha Reservation : मुंबईत उद्या बंदऐवजी ठिय्या आंदोलन!; जनजीवन सुरळीत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 8:18 PM

दादरच्या शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही हिंसा न करता लोकशाही मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचेही यावेळी ठरले.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चामधील मुंबई समन्वयकांनी बंदऐवजी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालय आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतर समन्वयकांनी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर काही समन्वयकांकडून मुंबई बंदची हाक दिली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये बुधवारी बंदबाबत संभ्रम दिसून आला.

दादरच्या शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही हिंसा न करता लोकशाही मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचेही यावेळी ठरले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाआडून काही समाजकंटक हिंसा घडवत असल्याची चर्चाही यावेळी झाली. तरी जे आंदोलन मुंबई बंद करण्याचा प्रयत्न करतील, ते त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर करावे, अशी प्रतिक्रिया एका समन्वयकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.

याउलट काही आक्रमक समन्वयकांकडून मुंबई बंदचे आवाहन करण्यात येत आहे. सायनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रतीक्षा नगर बेस डेपोपर्यंत रॅली काढण्याचा निर्णयही काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे. बुधवारी सकाळी १० वाजता ही रॅली काढली जाईल. तर वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेदरम्यान ठिय्या दिला जाईल.

दरम्यान,  पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज पोलीस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेत बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

काळ्या फिती लावून करा निषेध...मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी अधिकाधिक तरूणांनी ठिय्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय ज्या आंदोलकांना ठिय्यासाठी पोहचता येणार नाही, त्यांनी कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून मराठा समाजावरील अन्यायाचा निषेध व्यक्त करावा, असेही समन्वयकांनी सांगितले.

टॅग्स :मराठा आरक्षणमुंबईमराठा क्रांती मोर्चामराठामहाराष्ट्र