Maratha Reservation: खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. पण त्यांना खरी भेट ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी काल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजी राजे यांनी यावेळी सरकारसमोर ५ मागण्या ठेवल्या असून त्यापूर्ण करण्यासाठी ६ जूनपर्यंतचा वेळ दिला आहे. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संभाजी राजे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही मराठा आरक्षणाच्या भूमिकेबाबत संभाजी राजेंच्या भूमिकेशी सहमत असल्याचं मत व्यक्त केलं. "खासदार संभाजी राजे हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते एक महत्वाचे नेते सुद्धा आहेत. मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांना खरी भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालंय", असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज ते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहेत.