Maratha Reservation: आरक्षण मिळालं, पण जातीचा दाखला कसा काढायचा रे भाऊ ? वाचा प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 12:33 PM2018-12-02T12:33:09+5:302018-12-02T12:52:58+5:30

मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील प्रकियेचे अनुकरुन करावे लागणार आहे.

Maratha Reservation: Reserved, but how to get cast certificate? Read process | Maratha Reservation: आरक्षण मिळालं, पण जातीचा दाखला कसा काढायचा रे भाऊ ? वाचा प्रक्रिया

Maratha Reservation: आरक्षण मिळालं, पण जातीचा दाखला कसा काढायचा रे भाऊ ? वाचा प्रक्रिया

googlenewsNext

मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाला आहे. मात्र, मराठा समाजातील मुलांनी जात प्रमाणपत्र कसे काढायचे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यासाठी खालील प्रकियेचे अनुकरुन करावे लागणार आहे. 

* जातीचा पुरावा काढा.
* तुमचा जातीचा पुरावा - 
सर्वप्रथम तुमच्या नावापुढे "मराठा" असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा. पुर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत(True Copy) घ्या.
जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा. परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा, याची काळजी घ्या.
13 ऑक्टोबर 1967 चा जातीचा पुरावा -
तुमच्या वडिलांचा 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.
काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर, तुमच्या घरात 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या, आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याची "मराठा" अशी जात नमुद असणारा खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या. 
ब) जन्म-मृत्यु नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र 
अशा प्रकारे "मराठा" जातीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.

* तुमचा जातीचा दाखला
13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वीचा मराठा जातीचा पुरावा.
या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.

* रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे.
1) रेशनकार्ड
2) आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा.आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहीवासी दाखला घ्या.
किंवा
3) लाईट बिल किंवा कर आकारणी पावती
४) मतदान ओळखपत्र/पैन कार्ड/ड्राइविंग लाइसेंस/कॉलेज ओळ्खपत्र/आधारकार्ड
अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.
रेशनकार्ड
रहिवासी दाखला किंवा लाईट बिल
कोणतेही एक ओळखपत्र
या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.

* तहसीलदार कार्यालयातून जातीचा दाखला काढणे.
1) तुमच्या जातीचे, रहिवासी व ओळखीचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.
2) तेथुन जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा. अर्जावर 10 रु. किंमतीची तिकीटे/कोर्ट फी स्टँप लावा.
3) पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा -
पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
रेशनकार्डची सत्यप्रत
रहिवासी दाखला
तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
13 ऑक्टोबर 1967 च्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत

साध्या कोऱ्या कागदावर जातीबाबत व वंशावळीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर 5 रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र. 

4) कार्यालयीन प्रक्रिया -
हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे.
जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामांसाठी हे टोकन दाखवले तरी चालते.
टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला जातीचा दाखला घ्यावा व सर्व माहिती अचुक आहे का ते तपासुन पहावे.
जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.

सुचना
* जर 13 ऑक्टोबर 1967 पुर्वी जन्म झालेल्या तुमच्या वडिलांचा जातीचा पुरावा उपलब्ध असेल तर वडिलांशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी.
* वडीलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नाते संबंधितांचे पुरावे द्यावे लागत असल्यास तुमचे आणि त्या संबंधित व्यक्तीचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी आणि त्याबद्दल काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते ही द्यावेत.

* महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते, त्या संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.

* 13 ऑक्टोबर 1967 च्या पुराव्यासाठी ज्या व्यक्तीचा जातीचा पुरावा देणार आहात त्या व्यक्तीचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण ज्या तालुक्यात/ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येते त्याकडेच तुम्हाला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल.
* विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
अ) विवाहापुर्वीची जात सिद्ध करणारा कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
क) राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला. 
 

 

Web Title: Maratha Reservation: Reserved, but how to get cast certificate? Read process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.