मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:45 PM2023-09-01T22:45:07+5:302023-09-01T22:47:18+5:30
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला.
मुंबई - इंडिया आघाडीच्या बैठकीची सांगता झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरुन सरकारवर कडक शब्दात टीका केलीय. जालन्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, आता विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांनीही दगडफेक केली, ज्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या लाठीचार्जच्या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर, आता शरद पवार यांनीही या घटनेला पूर्णपणे गृहमंत्रालयच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 1, 2023
महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु, गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे, हि अतिशय संतापजनक बाब आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला. तसेच, जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो, असेही पवार यांनी म्हटले.
फडणवीसांनी मांडली भूमिका
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जालन्यातील घटना दुर्देवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपोषणकर्त्यांशी बोलले होते. आमचा विविध प्रकारे त्यांच्याशी संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पण, हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे, तो एका दिवसात सुटणार नाही. आम्ही त्यांची समजूत काढत होतो, पण ते ऐकत नव्हते.' 'काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती, ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल आणि त्यात तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते, पण त्यांनी ऐकले नाही. प्रशासन आज पुन्हा गेले पण दगडफेक करण्यात आली. १२ पोलीस जखमी झाले, त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला', अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.