Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; मराठा समाजातील मान्यवरांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:25 PM2018-08-02T12:25:03+5:302018-08-02T12:28:07+5:30
सरकारनं बोलावलेल्या बैठकीशी आपला कोणचाही संबंध नसल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे
मुंबई: मराठा समाजाच्या मोर्चांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आता सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. मराठा समाजातील मान्यवरांसोबत सरकारकडून चर्चा केली जाणार आहे. 'सह्याद्री' अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे उपस्थित आहेत.
मराठी समाजातील मान्यवर आणि विचारवंतांसोबत मंथन करुन मोर्चामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या बैठकीला अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब उपस्थित आहेत. या बैठकीसाठी छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र या तिघांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. 58 मोर्चे काढूनही सरकारला मराठा समाजाच्या भावना समजल्या नाहीत. मग आता चर्चेचा काय उपयोग, अशी भूमिका या तिघांनी घेतली आहे. तर या सरकारकडून केल्या जाणाऱ्या या चर्चेशी आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.