Join us

'अशाप्रकारची शिवराळ भाषा खपवून घेतली जाणार नाही'; अजित पवारांचा स्पष्ट शब्दात इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 8:30 PM

'राज्याच्या प्रमुखांबाबत शिवराळ भाषा केली जाते, अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोलले तरी खपवून घेतले जाईल, असे कोणी समजू नये.'

Maratha Reservation: आज मराठा आंदोलनामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले. या आरोपांवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज(दि.25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार (Ajit Pawar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. त्यानंतर सर्व सरकार यंत्रणा त्यात कामाला लागली. राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आधिकार आहे, पण आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घेतले पाहीजे. अधिकाऱ्यांशी बोलताना चुकीची भाषा वापरली जाते. उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले, जाणीपूर्वक काही वक्तव्य केली, उपमुख्यमंत्र्याच्या बाबतीत शिवराळ भाषा वापरली, हे खपवून घेतले जाणार नाही. यामागे कोण आहे हे शोधावं लागेल कारण एक व्यक्ती एवढे मोठे धाडस करु शकत नाही,' असं पवार म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'मराठा आरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागले आहे. याआधीही अनेकांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले. या मुद्द्यावर राज्याचे प्रमुख जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, प्रश्न धसास जावा यासाठीचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेटले आहेत. पूर्वी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता, मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळेच आता मराठा आरक्षणासाठी फार बारकाईने काम केले जात आहे.' 

'असे असतानाही काही लोक चुकीची व्यक्तव्ये करत आहेत. राज्याच्या प्रमुखांबाबत शिवराळ भाषा केली जाते, अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोलले तरी खपवून घेतले जाईल, असे कोणी समजू नये. कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेवर साडे सहा लाख हरकती आलेल्या आहेत, त्यावर काम चालू आहे. सरकार चांगले काम करत आहे, त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न कोणी करू नये,' असा इशाराही अजित पवारांनी यावेली दिला.

टॅग्स :अजित पवारमनोज जरांगे-पाटीलदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेमराठा आरक्षण