लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मैदान सोडणार नाही असे संभाजीराजे यांनी सांगितले. राज्य सरकारने १५ दिवसात सगळ्या मागण्या मान्य पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. परंतु अद्याप मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे आता लेखी स्वरूपात निर्णय द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. संभाजीराजे यांच्या भेटीसाठी अनेक नेते आझाद मैदानात येत आहेत. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही संभाजीराजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. खासदार अनिल देसाई यांनी सांगितले की, आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडतो. मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमचीही भूमिका आहे, असे सांगितले.
संभाजीराजे म्हणाले की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मनापासून आभार मानतो. गृहमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. संभाजीराजेंच्या तपासणीसाठी जे. जे रुग्णालयातून ४ डॉक्टरांचे एक पथक दाखल झाले होते. त्यांनी संभाजीराजेंचे रक्तदाब आणि ब्लड सॅम्पल घेतले. दोन्हीचे रिपोर्ट नॉर्मल होते.