मुंबई - जालन्यातील आंतरवाली सराटी येथे विराट सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा समाजाच्या कामासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. मराठाआरक्षणासाठीमराठा समाज बांधव अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. जरांगे यांच्या मुंबई भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली होती. अखेर, आज जरांगे पाटील मुंबईत पोहोचले असून सर्वप्रथम त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर, त्यांच्या नियोजित ठिकाणी त्यांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. यादरम्यान, त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवला. मात्र, कुटुंब आणि समाजावर बोलताना हा लढवय्या मराठाही गहिवरल्याचं पाहायला मिळालं.
तुमच्याकडे पाहून आईला कौतुक वाटतं, काळजी वाटते, त्या माऊलीची काय भावना असेल, असा प्रश्न जरांगे पाटील यांना विचारला. त्यावेळी, मी समाजालाच मायबाप मानलंय. आंतरवालीतील सभेत व्यासपीठावर माझं कुटुंब बसलं होतं. मी कुटुंबाला सांगितलं होतं, ज्या समाजासाठी मी लढतोय, तिथं तुम्ही नवरा म्हणून, बाप म्हणून किंवा मुलगा म्हणून नाही यायचं. कारण, माझा समाज खाली बसलाय, तुम्हाला व्यासपीठ नाही पाहिजे. मी माझं कुटुंब व्यासपीठावरुन खाली उतरवलं, तिथं नाही बसवू दिलं. कारण, माझ्यासाठी माझा समाज पहिल्यांदा आहे, मग कुटुंब. माझ्या समाजाला त्यादिवशी त्रास सहन करावा लागला. लाईट बंद केल्यामुळे लोकांना पाणी प्यायला नाही मिळालं, लोकांचे हाल झाले मी ते वाया जाऊ देणार नाही, असे म्हणताना जरांगे पाटलाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
वेळप्रसंगी टोकाचं उपोषण करू, माझी अंतयात्रा निघाली तरी चालेल, पण आता माघार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. एकतर मराठ्यांच्या विजयाची यात्रा निघणार किंवा माझी अंत्ययात्रा. मी बायको आणि पोरांनासुद्धा हे सांगितलंय. मी क्षत्रिय मराठा आहे, आलो तर तुमचा नाहीतर समाजाचा. माझ्या पट्ट्यात सगळ्यांना माहितीय का मागे हटत नाही. आता महाराष्ट्रालाही माहिती झालंय, ह्याने का कागद दिला तर हा मागे हटत नाही. माझी पहिल्यापासूनची सवय आहे, एखाद्या गोष्टीत उतरलो तर मागे नाही सरत. मी गद्दारी नाही करू शकत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका न्यूज १८ लोकमतशी बोलताना स्पष्ट केली.
शिवाजी मंदिरात समाजाशी संवाद
दरम्यान, मुंबीत शिवाजी मंदिर येथून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून आरक्षण देण्यात यावे, ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यास होकार दिला आहे. यावर, पुढील आठ दिवसांत आरक्षणाचा पेच सोडविणार की ठेवणार हा प्रश्न सरकारचा आहे. व्यवसायाधारित जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असल्यामुळे कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी आमची मागणी आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.