‘तो’ निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही, अधिसूचनेला विजय वडेट्टीवारांचाही विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 09:44 AM2024-01-31T09:44:29+5:302024-01-31T09:45:17+5:30
Maratha Reservation: मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांनी ही अधिसूचना काढली आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरात ओबीसींच्या सभेचे आयोजन केले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांनी ही अधिसूचना काढली आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरात ओबीसींच्या सभेचे आयोजन केले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
भुजबळ यांच्यानंतर वड्डेटीवार यांनीही सगेसोरऱ्यांबाबतच्या अधिसूचनेला विरोध केला आहे. ५ तारखेपासून राज्यातील आमच्या शक्तिस्थळाना भेट देऊन आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरुवात चैत्यभूमीपासून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी मुंबईत मंगळवारी ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केली होती, त्यानंतर ते माध्यमांशी बोलले.
सरकारच निर्माण करतंय वाद
- गृहमंत्री म्हणतात भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीयमंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही.
- मुख्यमंत्री म्हणतात आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यावरून विसंवाद दिसून येतो, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.