Join us

मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 5:14 PM

जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील राज ठाकरेंनी शोधावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मुंबई - राज्यात मराठा आरक्षणावरून वादंग पेटले आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. जरांगे पाटील सातत्याने राज्य सरकारला २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमची आठवण करून देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरताना दिसत आहेत. त्यामुळेच, त्यांनी दिवाळीही साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ते पश्चिम महाराष्ट्रा दौऱ्यावर असून आज पुणे जिल्ह्यात आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर वेगळीच शंका व्यक्त केली. त्यावर, आता जरांगे यांनी राज ठाकरेंना सवाल केला आहे.

जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील राज ठाकरेंनी शोधावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे आज पुणे जिल्ह्यातील दौंड गावात आहेत. राज ठाकरेंनी म्हटले की, मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो. परंतु आता जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचं असं आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होतायेत. हे इतके सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय अशा अनेक गोष्टी पुढे येतात, ज्यामुळे लोक ज्याने त्रस्त आहेत हे त्यांच्या डोक्यात येताच कामा नये. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिप्रश्न केला आहे. तसेच, माझ्या पाठिशी फक्त माझा समाज आहे, असेही ते म्हणाले. 

माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाही हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले. त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते. आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र, मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहिती झालं आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत, असंही जरांगे यांनी म्हटलं. 

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा सुरू झालेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी उत्साहात मनोज जरांगे यांचे स्वागत केले जात आहेत. २४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा २४ डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

राज ठाकरेंचा जनतेलाही सवाल

महाराष्ट्रात सध्या इतकी राजकीय संभ्रमावस्था आहे, जी आजपर्यंत मी कधीही पाहिली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे लोक हसण्यावर घेतो. मूळात या सर्व गोष्टी मतदारांची प्रतारणा, अपमान आहे. या अपमानाचा राग जोवर येत नाही. उघडपणे मतदारांचा विचार करत नाहीत. मतदारांना मुर्ख समजतात, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार काय भूमिका घेतात हे पाहायचे आहे. निवडणुकीत भलत्याच गोष्टींवर मतदान करणार असाल तर मतदारांची किंमत काय राहणार? राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदाराची भीती वाटली पाहिजे. कायद्याला कुणी विचारत नाही, मतदाराला कुणी विचारत नाही. तुम्ही केवळ मतदान करा, त्यामुळे निर्ढावलेले आहे. नुसते सुशिक्षित असून चालणार नाही तर सुज्ञ असावे लागेल असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केले. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेमुंबईमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील