...तर ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, जरांगे पाटील मुंबईच्या सीमेवर असताना भुजबळांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 03:22 PM2024-01-26T15:22:38+5:302024-01-26T15:28:53+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय झाल्यास, ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, असा इशारा राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा आंदोलकांनी मुंबईच्या सीमेवर धडक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आज सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय झाल्यास, ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, असा इशारा राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मुंबईत धडकलेल्या जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींवर अन्याय झाला असं लक्षात आलं. तर निश्चितपणे ओबीसींचं देखील आंदोलन सुरू होईल. त्यामुळे मला असं वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य तो निर्णय घेईल. तसेच आमची जी काही मतं आहेत ती आम्ही सभेतून मांडतो आणि विरोधसुद्धा करतो. तसेच तो करत राहणार, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शासकीय नियमांनुसार त्यावर अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. आता आणखी देऊन ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार आहे," असा दावा दीपक केसरकरांनी केला आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदान येथे जमण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये ही जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांचा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमला आहे.