मुंबई - मित्रांनो, मी तुम्हाला मोठा भाऊ म्हणून सांगतो. आपल्याला हाता-तोंडाशी आलेला घास हिंसाचार करून जाऊ द्यायचा नाही, असे भावनिक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मराठा आंदोलनातील तरुणांना केले आहे. मराठा आंदोलकांनी सोमवारी चाकण येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. तर त्यांनी यावेळी मराठा आंदोलकांना भावनिक आवाहनही केली.
महाराष्ट्रात विश्वास नांगरे पाटील यांचा वेगळाच चाहता वर्ग आहे. तर एमपीएससी आणि यूपीएससी तरुणांमध्येही त्यांची क्रेझ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून नांगरे पाटील यांना आदर्श मानण्यात येते. त्यामुळेच विश्वास नांगरे पाटील येताच तरुणांनी एकत्र येऊन त्यांचे भाषण ऐकून घेतले. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे, कारण माझ्या धमन्यांमध्ये छत्रपतींचे रक्त आहे, असे विश्वास पाटील यांनी म्हणताच तरुणांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी तरुणांना शांत राहण्याचे आवाहनही नांगरे पाटील यांनी केले. विश्वास नांगरे पाटील यांनी पुण्यातील आंदोलनात सहभागी होताच, एका मराठा तरुणाने चक्क त्यांचे पाय धरले. तर अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. नांगरे पाटलांनी आंदोलन हाताळताना मराठा तरुणांना भावनिक आवाहन केले. हाता-तोंडाशी आलेला घास आपल्याला जाऊ द्यायचा नाही, असेही ते पुण्याच्या चाकण येथील आंदोलनातील तरुणांना म्हणाले. दरम्यान, पुण्यातील चाकण येथे मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. या ठिकाणी 100 ते 150 गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ -