Join us

शिवरायांची शपथ, मराठा आरक्षण देणारच: मुख्यमंत्री, ५० मिनिटे भाषण, उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 5:54 AM

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारे हमासचीही गळाभेट घेतील

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवरायांची शपथ...मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आश्वस्त केले. 

शिवसेनाएकनाथ शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर  मंगळवारी पार पडला. मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे, मला त्यांचे दुःख, वेदना कळतात. कोणावरही अन्याय न करता, कुणाचेही न काढून घेता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, असेही शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ५० मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

त्यांचा आदर्श अफझलखान

हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी छत्रपतींचा आदर्श सोडून अफझलखानाचा आदर्श घेतला, अशी टीका करत उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नाही तर तो शिमगा मेळावा आहे. आताही टोमणे सभा सुरू असेल, अशी उपहासात्मक टीकाही शिंदे यांनी केली.

पुन्हा महायुतीचाच भगवा फडकणार

आम्ही इंडिया अलायन्स दहा तोंडी रावणाचे दहन २०२४ ला केल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही काहीही करा २०२४ ला मोदीच येणार आणि आपण राज्यात ४८ पैकी ४५ जागा देऊन त्यांना बळकटी देणार. विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.

मैदान नव्हे तर विचार महत्त्वाचे 

मागील वेळेसही मी शिवतीर्थावर दसरा मेळावा करू शकलो असतो, पण गेल्यावर्षी बीकेसीत मेळावा केला, असे सांगत माझ्यासाठी मैदान महत्त्वाचे नाही, विचार महत्त्वाचे आहेत. जिथे बाळासाहेबांचे विचार आहेत, तेच माझ्यासाठी शिवतीर्थ, आझाद मैदानाला स्वातंत्र्याचा इतिहास आहे, अशा मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे, असे शिंदे म्हणाले.

 

टॅग्स :दसराशिवसेनाएकनाथ शिंदे