मराठा आरक्षण : स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय बैठकीतील सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 05:45 AM2020-09-17T05:45:29+5:302020-09-17T06:11:20+5:30
आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सरकारसोबत आहोत असा विश्वास विरोधी पक्षांनी दिलेला आहे. यात कोणतेही राजकारण नाही, सर्व पक्ष एकत्र आहेत. आरक्षणास स्थगिती असताना मराठा विद्यार्थ्यांना काय दिलासा द्यायचा या बाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली.
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा झाली. ही स्थगिती उठविण्याची विनंती घटनापीठाकडे राज्य शासनाने करावी या बाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा किंवा फेरविचार याचिका दाखल करावी असे अन्य दोन पर्यायही समोर आले पण ज्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे त्यांच्याकडेच अंतरिम स्थगिती उठविण्यासंबंधी याचिका करावी असा आजच्या बैठकीतील सूर होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, याचिका घटनापीठाकडे पाठविताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती मिळाली.
आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सरकारसोबत आहोत असा विश्वास विरोधी पक्षांनी दिलेला आहे. यात कोणतेही राजकारण नाही, सर्व पक्ष एकत्र आहेत. आरक्षणास स्थगिती असताना मराठा विद्यार्थ्यांना काय दिलासा द्यायचा या बाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासंदर्भातील भूमिका सरकार एकदोन दिवसांत मी जाहीर करेन. आम्ही काही गोष्टी ठरविलेल्या आहेत. मी इतर घटकांशीदेखील चर्चा करेन.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकार तीन पर्यायांवर विचार करीत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे किंवा घटनापीठाकडे स्थगिती उठविण्यासाठी जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाहीत. तिसरा पर्याय योग्य वाटतो. आम्ही सरकारसोबत आहोत, यात कुठलेही राजकारण नाही. सरकार घटनापीठाकडे गेल्यास आम्ही त्याचे समर्थन करू. सर्व तयारीनिशी घटनापीठाकडे जाऊ आणि आरक्षण कसे बहाल करता येईल त्यासाठी प्रयत्न करू.
आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शेकापचे जयंत पाटील, शिवसंग्रामचे विनायक मेटे, लोकभारतीचे कपिल पाटील आदी उपस्थित होते.