मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी त्या विद्यार्थांच्या मागे उभा; समन्वयकांच्या बैठकीमध्ये निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:24 AM2019-05-13T04:24:23+5:302019-05-13T04:24:56+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईमध्ये शिवाजी मंदिर येथे एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये या मराठा डॉक्टर्स विद्यार्थ्यांच्या मागे पूर्ण मराठा समाज ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.
शिवाजी मंदिर येथे पार पडलेल्या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाजाचे समन्वयक आले होते. या बैठकीमध्ये विद्यार्थांना पाठिंबा देत, विद्यार्थांसाठी हिताचा निर्णय रविवारी रात्रीपर्यंत घेण्यात आला नाही, तर सोमवारी सकाळी ९ वाजता आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव जमतील, असेही पवार यावेळी म्हणाले. गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजाचे सर्व समन्वयक आझाद मैदानात आंदोलनाला बसले होते.
मराठा समाजाने वेळोवेळी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले, पण प्रत्यक्षात तो तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार ठरला, अशी प्रतिक्रिया वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केली. वैद्यकीय प्रवेशासाठी ज्या जागा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नाकारण्यात आल्या, त्या जागा परप्रांतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार का, असाही प्रतिप्रश्न त्यांनी केला. सरकारने विविध पातळ्यांवर आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असला, तरीही विद्यार्थ्यांचे त्यामुळे समाधान झालेले नाही. यामुळे त्यांनी सरकारने या प्रश्नांवर तोडगा काढेपर्यंत मुंबईमध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आझाद मैदानामध्ये गेल्या पाच दिवसांपासून या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थांच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे सायंकाळच्या सुमारास निघाले. मात्र, पोलिसांनी रस्ते बंद करून त्यांना रोखून धरले. सुमारे ३०० कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामिल झाले होते. तासाभराने सर्व वातावरण निवळले.