प्रवेश प्रक्रियांचा मार्ग मोकळा, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आले. एसईबीसी (सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे आता अभियांत्रिकी, फार्मसी व इतर प्रवेश प्रक्रियांच्या जागांमधील तिढा सुटून लगेचच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असणार असून, उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देताना एसईबीसी उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष लावण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. हा शासन निर्णय जिल्हा परिषद शाळा, शासकीय विद्यालय, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, शासकीय शैक्षणिक संस्था, अनुदानित, विनाअनुदानित विद्यालय, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत अशी सर्व प्राधिकरणे, सेवा व संस्था यांना लागू राहणार आहे.
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार आदी यांनी विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच यासाठी विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या दृष्टीने प्राधान्याने कार्यवाही करून प्रमाणपत्र देण्याची सोय करावी स्पष्ट करण्यात आले आहे.
........................