मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी केलं वांद्रेमध्ये शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 01:51 AM2018-08-10T01:51:28+5:302018-08-10T01:51:57+5:30
वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. डोळ्यांवर आणि तोंडावर काळी पट्टी बांधून महिला व लहान मुलांनी या वेळी सरकारचा निषेध केला.
आतापर्यंत ५८ मूक मोर्चे काढलेल्या मराठ्यांची सहनशीलता सरकारने पाहिली. मात्र यापुढे ठोक मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मराठ्यांचा आक्रमकपणा दाखवू, असा इशारा मराठा समन्वयकांनी सरकारला दिला. सरकारचे सोंग आता लाथ मारून उधळून टाकण्यासाठी मराठा मावळा सज्ज झाला आहे, अशी प्रतिक्रिया वरळी कोळीवाडा येथून आलेल्या मराठा मावळा पार्थ बावकर यांनी दिली.
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून चेतना महाविद्यालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता.
>क्रांती दिनी संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून लढा सुरू असून अनेक प्रसारमाध्यमांच्या मार्फत सरकारकडे मराठा मावळ्यांचा आक्रोश पोहोचत आहे. मोर्चे कसे असावे? हा मराठ्यांनी आदर्श घालून दिला. त्याचेच एक स्वरूप म्हणून वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलीस ठाण्यांत निवेदन देऊन केसेस मागे घ्याव्यात. मराठा आरक्षणासह सर्व मागण्या लवकरच मान्य झाल्या पाहिजेत.
- राजाराम मांगले, समन्वयक, सकल मराठा क्रांती मोर्चा, मानखुर्द